मुंबई : मुंबईकरांना गुरुवारपासून आणखी एका दरवाढीला सामोरे जावे लागणार असून, बेस्ट बससेवेची भाडेवाढ एक रुपयाने होणार आहे. सध्या बेस्टचे भाडे सहा रुपये असून, ते सात रुपये होणार आहे. बेस्टच्या साध्या बससेवेसह अन्य र्मयादित, वातानुकूलित आदी सेवांचेही भाडे महागणार आहे.
या दरवाढीमुळे बेस्टला १५0 कोटी रुपये मिळणार आहेत. ही भाडेवाढ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ही दरवाढ टाळण्यासाठी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर प्रयत्नशील आहेत. भाडेवाढ होऊनही बेस्टची तूट भरून निघणार नसल्यामुळे बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडे आर्थिक मदत मागावीच लागणार आहे. बेस्ट महापालिकेकडे ३00 कोटी रुपयांची मदत मागणार आहे. बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या २0१५-१६ च्या अर्थसंकल्पात दोन रुपये भाडेवाढ प्रस्तावित केली आहे. पण एवढी भाडेवाढ होण्याची शक्यता नसून प्रत्यक्षात किमान बोजा एक रुपयाचा पडणार आहे. येत्या फेब्रुवारीपासून भाडेवाढ होणार असली तरी ती रोखण्यासाठी अरुण दुधवडकर यांनी पुढाकार घेतला आहे.
५00 कोटी रुपये देण्याची शेवाळेंची मागणी
बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडे ५00 कोटी रुपयांची मागणी करणार आहे, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. नवी दिल्लीच्या परिवहन विभागाला केंद्र सरकार मदत करते. त्याच धर्तीवर बेस्टला अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणीही शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.