'मेट्रो-२'साठी झाडे तोडण्यास तात्पुरती मनाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2014

'मेट्रो-२'साठी झाडे तोडण्यास तात्पुरती मनाई

मुंबई : मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित दुसर्‍या टप्प्याचे गोरेगाव-आरे कॉलनीतील कारशेड बांधकाम आणि रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिकेला तात्पुरती मनाई केली. ख्यातनाम स्वयंसेवी संस्था 'वनशक्ती' व संस्थेचे संचालक दयानंद स्टॅलीन आणि स्थानिक रहिवासी क्षितिज अष्टेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा मनाईचा आदेश दिला. 

या जनहित याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. दहिसर ते मानखुर्दला जोडणार्‍या मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे पुढील काम न करण्याचे निर्देशही खंडपीठाने एमएमआरडीए व पालिकेला दिले. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम केले जात आहे. हे काम करताना हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. अशा प्रकारे होणारी झाडांची कत्तल ही पर्यावरण संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. प्रस्तावित मेट्रो-२ च्या प्रकल्पांतर्गत कारशेडच्या बांधकामाचा पालिकेचा प्रस्ताव आणि आरे कॉलनी रोड रुंदीकरणाचा एमएमआरडीएचा प्रस्ताव रद्दबातल ठरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई शहराचा पर्यावरणदृष्ट्या समतोल ढळू नये म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीसारख्या हरित क्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे, याकडेही 'वनशक्ती' संस्थेने न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

Post Bottom Ad