आयुक्तांसह तीन अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2014

आयुक्तांसह तीन अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - न्यायालय

मुंबई : डॉकयार्ड रोड येथील धोकादायक बाबू गेनू मार्केट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पालिका आयुक्तांसह तीन अतिरिक्त आयुक्तांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे आणि दुर्लक्ष केल्याचे पुरेसे पुरावे आहेत, यामुळे या सर्वांविरोधात भादंवि ३0४ (३४) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश भोईवाडा न्यायालयाने दिले आहेत. 
पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर-म्हैसकर, नवृत्त अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी हे या दुर्घटनेस जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आणि १२ जानेवारी २0१५ रोजी भोईवाडा न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेते शरद राव व अँड़ एस.टी. मार्कंडेय यांनी पत्रकारांना दिली. या वेळी युनियनचे अँड़ महाबळ शेट्टी, उदय आंबोणकर उपस्थित होते. 

'बाबू गेनू मंडईची इमारत धोकादायक आहे. इमारतीचे पिलर जमिनीत घट्ट नसून जमीन सोडून वर लटकत आहेत. यामुळे ही इमारत तत्काळ रिकामी करून पाडून टाकावी, असा अहवाल पालिकेचे उपमुख्य अभियंता बी.ए. सागवेकर यांनी ६ जुलै २0१२ रोजी दिला होता. मात्र आयुक्त कुंटे आणि तीन अतिरिक्त आयुक्तांनी कोणतीही तत्काळ आणि विनाविलंब कृती केली नाही. त्यामुळे झालेल्या इमारत दुर्घटनेस आणि जीवित व मालमत्ता हानीस हे जबाबदार आहेत,' असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे, असे अँड़ मार्कंडेय म्हणाले. 

या दुर्घटनेप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात सी. आर. ९४-२0१३ अंतर्गत अशोक मेहता आणि पालिकेचे दुय्यम अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला, मात्र या घटनेला जबाबदार असणारे पालिका आयुक्त व तत्कालिन तीन अतिरिक्त आयुक्तांविरोधात कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळेच राव यांना दाद मागावी लागली आणि सर्व पुरावेही दाखल करावे लागले, अशी माहिती अँड़ मार्कंडेय यांनी दिली. 

शरद राव यांनी न्यायालयात इमारत दुर्घटनेतील मृतांचे मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामे, साक्ष व पुरावे सादर केले होते. या दुर्घटनेस आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली होती, असे त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने या दुर्घटनेप्रकरणी पालिकेचे उपमुख्य अभियंता सागवेकर यांच्याविरोधात कारवाई करून, त्यांना तुरुगात पाठवले आहे, हे चुकीचे आहे, असे अँड़ मार्कंडेय यांनी सांगितले.


योग्य ती कायदेशीर उपाययोजना करणार ! 
बाबू गेनू दुर्घटनाप्रकरणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर भोईवाडा न्यायालयाच्या महानगर दंडाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्त आणि तीन अतिरिक्त आयुक्त यांच्याविरोधात जारी केलेल्या आदेशाची प्रत मिळाली आहे. प्रशासन यासंदर्भात योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयासमोर आपली बाजू मांडेल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे. मात्र बाबू गेनू प्रकरणात शरद राव यांनी केलेले आरोप प्रशासन नाकारत आहे, असे सांगून आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'प्रशासन या कायद्याच्या तरतुदीनुसार काम करते आणि या दुर्घटनेप्रकरणी कायद्याच्या चौकटीतच राहून योग्य ती पावले उचलली आहेत.

Post Bottom Ad