मुंबई (प्रतिनिधी)- जवखेडा दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आणि पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने जाब विचारण्यासाठी भीमशक्ती या संघटनेच्यावतीने 25 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर `हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा या संघटनेचे अध्यक्ष व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यात सोनई, खर्डा व आता जवखेडा येथे दलितांचे हत्याकांड झाले. या हत्याकांडाला एक महिन्याचा कालावधी होत आला तरी अद्याप आरोपींना पोलिस प्रशासन अटक करू शकलेले नाही. राज्य शासनानेही हे हत्याकांड गांभीर्याने घेतले नसल्याने या प्रकरणाच्या तपासाबाबत शंका उपस्थित करत तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी हंडोरे यांनी केली.
स्थानिक जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्यात यावे, नगर जिल्हा अन्याय अत्याचारग्रस्त घोषित करावा, मयतांच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, हत्याकांड घडलेल्या गावांचा तंटामुक्ती पुरस्कार व प्रशस्तिपत्रक काढून घ्यावे, तसेच राज्यातील दलितविरोधी असलेली तंटा मुक्ती योजना रद्द करावी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.