बेस्ट उपक्रम सध्या तोटय़ात सुरू आहे. मात्र, तरीही बेस्टने 2013-14 या वर्षांत केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला विविध करांपोटी तब्बल 114.47 कोटी दिल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी दिली आहे.
बेस्ट उपक्रमाचा 2015-16 या वर्षासाठी सादर केलेला 7185.56 कोटी रुपयांचा व 946.32 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प गुरूवारी बेस्ट समितीच्या बैठकीत साधकबाधक चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. त्यावेळी अरुण दुधवडकर यांनी बेस्टची दयनीय आर्थिक स्थिती, तोटा, त्यावरील उपाययोजना यांची गोळाबेरीज मांडली. तसेच बेस्टने गेल्या वर्षभरात केंद्र, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिलेल्या विविध करांची आकडेवारीसह माहितीही दिली.
बेस्टने केंद्र सरकारला केंद्रीय विक्री करापोटी 2.21, राज्य सरकारला पथकरापोटी 9.28, मोटार वाहन करापोटी 2.06, नोंदणी व परवाना शुल्कापोटी 27.98, मूल्यवर्धित करापोटी 61.21 आणि मुंबई महापालिकेला जकात करापोटी 3.87, मालमत्ता करापोटी 7.86 कोटी रुपये दिले आहेत.