केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ५0 जवानांना डेंग्यूची लागण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2014

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ५0 जवानांना डेंग्यूची लागण

मुंबई : अँण्टॉप हिल येथील सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनीत राहणार्‍या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवळपास ५0 जवानांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. या कॉलनीतील रहिवासीडेंग्यूच्या दहशतीखाली आहेत. मात्र, या कॉलनीचा ताबा असलेला केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) स्वच्छतेबाबत कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याने रहिवाशांची चिंता वाढली आहे.

डेंग्यूचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झालेल्या या कॉलनीत केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, सीआयएसएफ आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यासारख्या केंद्रीय विभागांचे कर्मचारी-अधिकारी वास्तव्य करतात. यात जवळपास १000 सीआयएसएफ जवानांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. मागील महिनाभरात येथील रहिवासी असलेल्या सीआयएसएफच्या जवळपास ५0 जवानांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच अन्य विभागांचे कर्मचारीही या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. डेंग्यूग्रस्त रहिवाशांची संख्या वाढतच चालली आहे. ही एक चिंतेची बाब असल्याचे कॉलनीतील रहिवासी सांगतात. आमच्या कॉलनीच्या मागील बाजूला नाला आहे. त्याचबरोबर धारावी झोपडपट्टीतील अस्वच्छता आणि काही इमारतींचे सुरू असलेले बांधकाम या बाबी डेंग्यूचा फैलाव वाढवत आहेत, असे एका दक्ष नागरिकाने सांगितले. कॉलनीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर कचरा साचला आहे. हा कचरा करणारे लोक कॉलनीबाहेरील असून त्यांच्यावर कारवाईची पावले उचलली पाहिजेत. मात्र, कॉलनीचा ताबा असलेला केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे काणाडोळा करत असल्याची नाराजी रहिवासी व्यक्त करत आहेत.

Post Bottom Ad