डेंग्यूचा सामना करण्यासाठी पालिकेकडे फक्त २५00 कर्मचारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2014

डेंग्यूचा सामना करण्यासाठी पालिकेकडे फक्त २५00 कर्मचारी


मुंबई : मागील महिन्यात डेंग्यूचे सुमारे ४,000 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ऑक्टोबर २0१३च्या तुलनेत यामध्ये ६0 टक्के वाढ झाली आहे. पण सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत डेंग्यूचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडे केवळ २,५00 कर्मचारी आहेत. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून काढणे, डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे काम या कर्मचार्‍यांकडून करण्यात येते. त्यामुळे पालिकेचे इतके कमी कर्मचारी मुंबईमधील डेंग्यूचा मुकाबला कसा करणार असा सवाल उपस्थित होत आहे. 
मुंबईकरांना डेंग्यूपासून सुरक्षित ठेवण्याचे काम पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे आहे; पण या विभागात मागील २५ वर्षे कर्मचार्‍यांची भरतीच करण्यात आली नाही. २५ वर्षांपूर्वी या विभागात १६0 कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती. दोन दशकांनंतरही या विभागातील कर्मचार्‍यांच्या संख्येत फरक पडला नाही. २00१ ते २0११ या कालावधीत शहराच्या लोकसंख्येत ७ टक्क्यांनी भर पडल्याचे मागील जनगणनेनुसार पुढे आले आहे. पण कीटकनाशक विभागातील कर्मचार्‍यांची संख्या मात्र जैसे थेच राहिली आहे. मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला होता. मलेरियाचा फैलाव करणार्‍या अँनोफिलीस डासांची पैदास रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना डेंग्यूच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी उपयोगात येतीलच असे नाही. कारण या डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे ही वेगळी असतात, असे पालिका अधिकार्‍याने सांगितले. 'डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. कारण ईदीस डासांची पैदास ही बहुतेककरून घरांमध्ये होते. डेंग्यूचा फैलाव ज्या महिन्यांत होतो त्याकडे लक्ष देऊन घरोघरी जाऊन तपास करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी संख्या आणि स्वयंसेवकांची गरज आहे,' असे प्रजा फाऊण्डेशन या स्वयंसेवी संस्थेचे प्रकल्प अध्यक्ष मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

Post Bottom Ad