स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन स्पष्ट बहुमत मिळविण्याच्या वल्गना करणा-या भारतीय जनता पक्षाला आपली मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची काहीही मदत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संघाने भाजप सत्तेवर यावा यासाठी जशी मेहनत घेतली होती ती पाहता या निवडणुकीत संघाची भूमिका काय राहील याकडे तमाम राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले होते. मात्र, राज्य पातळीवर भाजपने आपल्या ताकदीचा वापर करून सत्ता आणावी असे संघाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संघाच्या प्रवक्त्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दस-याच्या दिवशी मोदींचे कौतूक करीत भारत देश मजबूतीने उभा राहिला पाहिजे असे मत व्यक्त केले होते. मात्र त्याचवेळी भागवत यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे संघाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत साशंकता होती. मात्र, आज संघाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचा प्रचार करणार नसल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने सक्षम नेतृत्त्व सक्षम केले नसल्याची खंत संघाने व्यक्त केली आहे. देशात भाजपने ज्याप्रमाणे मोदी यांच्यासारख्या नेत्यांचे सक्षम नेतृत्त्व पुढे आणले तसे महाराष्ट्रातही भाजपने एक सक्षम नेतृत्त्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असे संघाने मत व्यक्त केले आहे.