शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे सज्ज

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची आठवण करून देणारा रंगमंच, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भव्य छायाचित्रे आणि सुमारे 60 हजार निमंत्रितांना सामावून घेणाऱ्या आसन व्यवस्थेसह वानखेडे स्टेडियम, भाजपचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी सज्ज झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शाही सोहळ्यासाठी सर्व व्यवस्था चोखपणे उभ्या राहाव्यात यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्या चमूसह राबत आहेत. हा समारंभ नेत्रदीपक ठरावा यासाठी तयारी सुरू असून कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि रंगमंच व्यवस्थापक राजू सावला रात्री उशिरापर्यंत कामावर हात फिरवीत होते.

वानखेडे स्टेडियममध्ये (ता. 31) होणारा हा सोहळा भाजपच्या इतिहासातला सर्वांत संस्मरणीय अध्याय ठरावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मरीन ड्राईव्हच्या रस्त्यालगत असणाऱ्या समुद्रात जहाजांवर कमळाच्या भव्य प्रतिकृती तरंगत्या ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात वास्तव्याला असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, तसेच सचिन तेंडुलकर यांच्यासह बॉलिवूड, तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर मंडळींसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचे कुटुंबीय, तसेच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना या समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांतील भाजपचे कार्यकर्ते या समारंभासाठी हजर राहणार आहेत. नागपुरातील सुमारे 1200 कार्यकर्ते या सोहळ्याला हजर राहणार आहेत. या सर्वांची सोय सध्या मुंबईतील वेगवेगळ्या निवासस्थानांत करण्यात आली आहे.

सोहळ्याच्या प्रारंभी अशोक हांडे यांनी दिग्दर्शित केलेला कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. केवळ 40 मिनिटांच्या या सोहळ्यात सुकाणू समितीतील पाच सदस्यांसह आदिवासी आणि दलित मंत्र्यांचा समावेश केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या मातुःश्री सरिताताई, पत्नी अमृता, मुलगी दिविजा यांच्यासह सर्व मंत्र्यांचे कुटुंबीय सोहळ्यास हजर राहतील. पंतप्रधानांबरोबरच भाजपचे केंद्रीय नेते, तसेच शेजारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Post Bottom Ad