धुळे : ‘मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग याच एका विषयावर कॉंग्रेसने गेल्या अनेक निवडणुका लढवल्या. पण पंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे त्यांचेच राज्य होते. तरीही एका इंचाचीही प्रगती झाली नाही,‘ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (मंगळवार) केली. धुळे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांनी आज येथे सभा घेतली.
मोदी यांनी आजच्या भाषणास अहिराणी भाषेतून सुरवात करत उपस्थितांची मने जिंकली. मोदी म्हणाले, "आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वचने दिलेली नाहीत. वचने दिली आहेत, ती येथील आदिवासींचे जीवन बदलण्यासाठी. महाराष्ट्राचा विकास झाला नाही, तर देशाचाही विकास होणार नाही. गेल्या 50 वर्षांपासून कॉंग्रेसने राज्य केले; पण कोणताही हिशोब दिला नाही. मी मात्र 60 महिन्यांच्या पूर्ण हिशोब जनतेसमोर मांडणार आहे.‘‘ सभेसाठी धुळे जिल्ह्यातील उमेदवार जयकुमार रावल, डॉ. विजयकुमार गावित, अनिल गोटे, मनोहर भदाणे, मंजुळा गावित, जितेंद्र ठाकूर, उदयसिंह पडवी उपस्थित होते.
मुंबई महाराष्ट्राचीच!
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. "मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे.. महाराष्ट्र आणि मुंबईशिवाय भारतही अपूर्ण आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही,‘‘ असे ठाम प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांनी आज दिले.
विरोधक पराभवाच्या उंबरठ्यावर निवडणुकीमध्ये आता पराभवाच्या उंबरठ्यावर असणारे आता कुठल्याही थरास जाऊन प्रचार करत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली. ‘गेली 60 वर्षे कॉंग्रेसने असेच राजकारण केले. त्यातून जनतेला काय मिळाले? याच पद्धतीचे राजकारण करून पाच महिन्यांपूर्वी काय निकाल लागला, हे सर्वांच्या लक्षात आहे. विरोधक जितका चिखल फेकतील, तितकेच कमळ जास्त फुलेल,‘ असे मोदी म्हणाले. ‘येथील आदिवासी चांगले शिकून डॉक्टर, पायलट बनू शकत नाहीत का? त्यांच्यात काहीही उणीव नाही.. उणीव आहे ती सरकारच्या निर्णयप्रक्रियेमध्ये. हे चित्र बदलायचे आहे,‘ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.