नगर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली त्यावेळी माझ्या घरचेही हसले असतील, अशी संभावना करणाऱ्या राज ठाकरे यांना आता विधानसभा निवडणुकीत एकच जागा मिळाल्यावर त्यांना हसू आले का रडू, असा सवाल आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी येथे केला.
'गेल्या वेळी तेरा जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी मतदारांनी नाकारले असून, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली आहे. ते माझी जाहीर सभेतून खिल्ली उडवत होते. माझ्या पक्षाला चिन्ह नाही, असेही ते हिणवतात. परंतु आता त्यांचे चिन्हही जाण्याच्या मार्गावर आहे. ठाकरे यांनी गरिबांच्या मतांची किंमतही कळली नाही, असा टोला मारून आठवले म्हणाले,'मी कमी जागा लढवतो त्यामुळे मला पक्ष चिन्ह मिळत नाही. आम्ही पाठिंबा देणाऱ्या पक्षाला दलित मते चांगली मिळतात. ही मते निवडणुकीत ग्रेस मार्कसारखेच आहेत. माझ्या पक्षाला आठ जागा मिळूनही एकही जागा जिंकता आली नाही. याची मलाही खंत आहे. काही ठिकाणी आरपीआयचे उमेदवार कमी मताने हरले आहेत.
केंद्रात भाजपचे सरकार असल्याने चांगल्या योजना गरिबांसाठी मिळतील. त्यासाठी शिवसेनेबरोबर न जाता भाजपबरोबर गेला आहे. आरपीआयचे उमेदवार निवडून आले नसले, तरी दोघांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीपद मिळावे, अशी मागणीही भाजपकडे केली असल्याचे आठवले यांनी सांगितले.शिवसेना-भाजप हे एकत्र लढले असते तर २४० आसपास जागा जिंकल्या असता. येत्या काळात शिवसेना भाजबरोबर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊ केला असला, तरी तो पाठिंबा नको आहे. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असून, राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होऊन, सरकारला फटका बसेल, असेही आठवले यांनी सांगितले आहे.