मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. याचबरोबर शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही या समारंभाला उपस्थिती लावली. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आज दुपारी फोन करून आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. शिवसेनेला सन्मानाने वागवणार नसतील, तर शपथविधी सोहळ्याला जाऊन उपयोग नाही. त्यापेक्षा विरोधी बाकावर बसू, अशी कडक भूमिका शिवसेनेने घेताच भाजपने नमते धोरण घेतले तर सेनेनेही आपला अहंकार सोडून या सोहळ्यात सहभागी झाल्याचे दिसत आहे. आपला सन्मान राखला नसल्याचे सांगत शिवसेनेने आजच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र आता भाजप-सेनेत 'ऑल इज वेल' स्थिती झाली आहे. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवर काही मिनिटे चर्चा झाली. यात आगामी काळात कसे पुढे जायचे व कशी चर्चा करायची याची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत काहीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला 6 कॅबिनेट व 6 राज्यमंत्रीपद देऊ शकते. शिवसेनेला ते मान्य होणार का याकडे लक्ष आहे.
त्याआधी शिवसेनेने भाजपकडे केलेल्या मागण्यांचा व प्रस्तावाचा आम्ही सकारात्मक विचार करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन अमित शहा यांनी उद्धव यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही आज दुपारी पुन्हा एकदा फोन करून उद्धव ठाकरेंना वस्तुस्तिथीची माहिती दिली व सोहळ्यात सामील होण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत आजच्या सोहळ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे आमदारही या सोहळ्यात सहभागी होतील असे राऊत यांनी या घडामोडीनंतर माहिती देताना सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, भाजपचा मागील अनेक वर्षातील मित्रपक्ष शिवसेनेचा आदर न राखल्याने आजच्या सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, शिवसेनेची व उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी व आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा व अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फोन करून विनंती केली. भाजप सरकार शिवसेनेला सोबत घेणार आहे. त्यामुळे आजच्या सोहळ्याला उपस्थित राहावे अशी दोघांनी उद्धव यांना विनंती केली आहे. मात्र, उद्धव यांनी शहा-जेटलींना उपस्थित राहण्याबाबत प्रथम कोणतेही आश्वासन दिले नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ असे उद्धव ठाकरे यांनी या दोघांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नसल्याचे सांगितल्यामुळे अस्वस्थ शिवसेनेने शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. शपथविधी समारंभाचे निमंत्रण देण्यात आले असले, तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे अन्य नेतेही या समारंभाला गैरहजर राहणार होते. शिवसेनेला सन्मानाने वागवणार नसतील, तर शपथविधी सोहळ्याला जाऊन उपयोग नाही. त्यापेक्षा विरोधी बाकावर बसू, अशी कडक भूमिका घेत शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच भाजपने हालचाली करून उद्धव यांना मनवण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारला अपशकुन नको म्हणून विरोधी बाकावर बसण्याची घोषणा लांबणीवर टाकण्यात आली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुंबईत बोलावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी त्यांच्याशी चर्चा करतील. या मेळाव्यातच शिवसेनेचा गटनेता निवडला जाणार आहे. रंगशारदामध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते भाजपसोबतच्या वाटचालीबाबत घोषणा करणार असल्याचे पुढे आले होते. मात्र, आता भाजपने सत्तेत योग्य वाटा देण्याचे आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.