महाड - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतीमेचे आणि प्रगती करणारे नेते आहेत. मार्केटिंग करणारे नेते नाहीत, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी (बुधवार) सांगितले.
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची पहिलीच प्रचारसभा महाडमध्ये झाली. महाडमधील काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपवाले येथे येऊन सांगत आहेत, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. महाराष्ट्र कायम गुजरातच्या पुढे आहे. कर्करोग औषधांच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. याचा फटका गरिबांना होत आहे. आपला हात पकडून पुढे नेणारे सरकार आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण दररोज लढत आहात. देशाच्या विकासात प्रत्येकाचा हात आहे. काँग्रेसने गरिबांच्या हितासाठी बनवलेले कायदे बदलण्यात येत आहेत. महाराष्ट्रात औद्योगिक आणि कापड व्यवसाय आणण्यात येणार असून, त्यामुळे पंधरा लाख युवकांना रोजगार मिळणार आहे.
चीनचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर आपले पंतप्रधान त्यांच्याबरोबर झोपाळ्यावर झोका घेत होते. अन् तिकडे चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसले होते. त्यावेळी पंतप्रधान याबाबत एक शब्दही बोलले नाहीत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत आहे, भारताचे नागरिक मरत आहेत. आपले पंतप्रधान इकडे सभा घेण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षाचे नेते साठ वर्षांत काहीच झाले नाही, असे सांगत आहेत. ते सर्वजण एकप्रकारे सर्व महापुरूष व नागरिकांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.‘‘