मुख्यमंत्री भाजपचाच असणार - अमित शहा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2014

मुख्यमंत्री भाजपचाच असणार - अमित शहा


amitshbjp
जनतेने त्रिशंकू कौल दिल्याचे स्पष्टपणे दिसत असताना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेसाठी गणितांची जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजप सत्तेसाठी राष्ट्रवादीने देऊ केलेला पाठिंबा घेते कि पुन्हा आपला जुना मित्र शिवसेनेला साद घालते, हे पहावे लागणार आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार, असा दावा केला आहे. 
महाराष्ट्रात जे निकाल समोर येत आहेत त्यात भाजप बहुमताच्या जादुई आकड्यापासून २० ते २५ जागा जागा दूर राहणार असल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेसाठी जुना मित्र शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागणार आहे. यापैकी शिवसेनेने आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत मात्र राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे जनमताचा आदर करून आम्ही सत्ता स्थापण्यासाठी पुढे जाणार आहोत, असे शहा म्हणाले.

शहा यांनी राष्ट्रवादीने देऊ केलेल्या पाठिंब्याचाही आदरपूर्वक उल्लेख केला. यावेळी शिवसेनेशी पुन्हा युती करणार का, असा प्रश्न विचारला असता शिवसेनेसोबत आम्ही कधीही नातं तोडलेलं नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही. शिवसेनेसोबतची युती आम्ही तोडलेली नाही, केंद्रात अजूनही शिवसेना आमच्यासोबत आहे, मुंबई महापालिकेतही आमची युती आहे, असे सूचक विधान शहा यांनी केले.

शिवसेनेची कोंडी?
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या प्रस्तावाआधीच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर करून शिवसेनेची चांगलीच कोंडी केल्याचे दिसत आहे. राज्यात भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. अशावेळी भाजप आपल्या जुन्या मित्राला पुन्हा साद घालेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनाही सर्व परिस्थितीवर सावधपणे बोलताना दिसत होती मात्र शरद पवार यांच्या 'पॉवर प्ले'मुळे कहानीत 'ट्विस्ट' निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या सत्तेचं गणित काय असणार आहे, याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

संघाचा विरोध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास जोरदार विरोध केल्याचे वृत्त येत आहे. लखनऊ येथे संघ नेते बैठकीसाठी एकत्र आले असून तेथूनच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नका, असा संदेश भाजप नेतृत्वाला धाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Post Bottom Ad