शनिवारीही मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

शनिवारीही मेगाब्लॉक

तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने आता शनिवारीही देखभाल-दुरुस्तीसाठी 'मिनिब्लॉक' घेण्याचा गांभीर्याने विचार चालवला आहे. रविवारच्या मेगाब्लॉकमुळे देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निकालात निघत नसल्याने 'मिनिब्लॉक'चा पर्याय पुढे आला आहे. केवळ एका दिवसाच्या मेगाब्लॉकमुळे प्रचंड ताण असणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावरील तांत्रिक अडचणी कमी होत नसल्याने अतिरिक्त मेगाब्लॉकची योजना आहे. 

मध्य रेल्वेवर लोकलच्या दररोज सुमारे १६०० फेऱ्या होतात. त्याशिवाय लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि मालवाहतूकही सुरू असते. त्यामुळे रुळांसह ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी फार वेळ हाती मिळत नाही. त्यामुळेच, देखभालीअभावी ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल यंत्रणा बंद होणे, रुळांना तडे पडणे आदी विविध तक्रारी वाढत आहेत. त्यासाठीच शनिवारच्या 'मिनिब्लॉक'चा विचार केला जात आहे.

हा मेगाब्लॉक साधारण शनिवारी रात्री आणि आवश्यकता पडल्यास दुपारच्या सुमारास हाती घेण्याची शक्यता आहे. केवळ देखभालीतील त्रुटी भरून काढण्यासाठी 'मिनिब्लॉक'चा विचार पुढे आला असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार ब्रिद यांनी सांगितले. हा मिनिब्लॉक शनिवारी दुपारी २ ते ४ या वेळेत घेतल्यास हाफ डे असणाऱ्या नोकरदारांना मिनिब्लॉकचा त्रास होणार नाही, असेही सांगितले जात आहे. यावर्षी विविध सणांमुळे रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याची वेळ अनेकदा मध्य रेल्वेवर आली होती. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा उद्देश पूर्ण न झाल्याने तांत्रिक अडचणींमध्ये वाढ झाली होती. ही स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी किमान मिनिब्लॉक उपयुक्त ठरेल, असा दावा केला जात आहे.

गेल्या एप्रिलपासून आतापर्यंत ओव्हरहेड वायर तुटण्याचे सुमारे ७० ते ७२ प्रकार झाले आहेत. तर गेल्या महिन्यातच लोकल रुळांवरून घसरण्याचे सहा प्रकार झाले आहेत. त्यावेळी देखभालीत कमतरता हा मुद्दा उपस्थित झाल्याने 'मिनिब्लॉक'ची योजना मांडण्यात आल्याचे अधिकारी सांगतात.

Post Bottom Ad