डेंगीच्या अळ्या सापडल्यास अटक होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

डेंगीच्या अळ्या सापडल्यास अटक होणार

मुंबई : शहरातील डेंगीच्या फैलावावरून आरोप होत असताना ज्यांच्या घरात डेंगीच्या डासांच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याला कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात डेंगीच्या अळ्या सापडल्या होत्या, मग आयुक्तांना अटक करणार का? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. 


डेंगीला कारणीभूत ठरणारा एडिस डास घरात वाढतो. अनेक घरांमध्ये या डासाच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यांना तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा नोटिसा यापूर्वीच पाठवल्या आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत काहीच बदल न केल्यास थेट फौजदारी कारवाई करून संबंधितांना अटक करण्याचे निर्देश आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. 

आतापर्यंत पालिकेने 600हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत. पुढील टप्प्यात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ती शुक्रवारपासून (ता. 31) सुरू होईल. परंतु कॉंग्रेसने त्याला विरोध केला आहे. केईएम रुग्णालयाच्या डॉ. श्रुती खोब्रागडे यांचा डेंगीने मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या तपासणीत रुग्णालय परिसरात डेंगीचे डास आढळले होते. मग त्यासाठी आयुक्तांना अटक करणार का? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे. 

आंबेरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत डेंगीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांची नोंद महापालिका करत नसल्याचे निदर्शनात आणून दिले. भांडूप-कांजूरमार्ग परिसरात डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर संपूर्ण शहरात अशीच परिस्थिती असल्याचे इतर सदस्यांनी सांगितले. डेंगी "नोटिफाईड‘ आजार नसल्याने खासगी रुग्णालयांतून त्यांची माहिती घेण्यात अडचणी येत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे यांनी सांगितले. तर डेंगी नोटिफाईड करण्यासाठी राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार करणार असल्याचे डॉ. नागदा म्हणाल्या. 

महापालिकेने डेंगीच्या आजाराचा धोका असलेले विभाग शोधून काढले आहेत. यात ज्या भागात मलेरियाचे रुग्ण आहेत, तेथेच डेंगीचे रुग्ण जास्त असल्याचे आढळले. भायखळा, परळ, वांद्रे आणि घाटकोपर यांचा त्यात समावेश आहे. डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका जनजागृतीबरोबरच स्वच्छता मोहीम राबवणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad