नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नियमित पीएच.डी सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या आज झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यापूर्वी ज्यांची पीएच.डी २००९ च्या यूजीसीच्या मार्गदर्शक नियमांनुसार नाही, त्या विद्यार्थ्यांचे कोर्सवर्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना पीएच.डीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
विद्यापीठाच्या यश इन इमारतीत आज विद्वत परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.ए. मास कम्युनिकेशन जर्नालिझम शिक्षणक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. एम.ए. शिक्षणक्रम अन्य विद्यापीठांच्या सहकार्याने सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्राची ओळख, माहिती व्हावी म्हणून ‘पर्यावरणशास्र’ विषयाचा विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांतर्गत सुरु पदवी शिक्षणक्रमांत समावेश करण्याचाही अतिशय महत्त्वाचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधिष्ठीत नवीन शिक्षणक्रम निरंतर विद्याशाखेमार्फत लवकरच सुरु करण्याबाबत चर्चा झाली. याबरोबरच कम्युनिटी कॉलेजसाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले. या बैठकीस विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. संजय खडक्कर, प्रा. एन.जी. चांदेकर, प्राचार्य दिनेश पंजवानी, डॉ. सुरेंद्र गोळे, डॉ. नरेश चंद्र, डॉ. चंद्रशेखर चितळे, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते.