फुकट्या प्रवाशांकडून ३९ लाखांचा दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

फुकट्या प्रवाशांकडून ३९ लाखांचा दंड वसूल

मुंबईची जीवनवाहिनी हे बिरुद मिरवणार्‍या लोकलमधून विनातिकीट प्रवास करणार्‍या फुकट्यांविरोधात वेळोवेळी कारवाई करूनदेखील या फुकट्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. विनातिकीट प्रवास करण्यापासून प्रवाशांना परावृत्त करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने 'फोट्र्रेस चेक' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत तिकीट तपासणीसांची फौज परेच्या मुख्य स्थानकांवरील पादचारी पुलांवर प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करीत आहे. मागील पाच महिन्यांत १५ हजार फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३९.९३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

अंधेरी स्थानकात फुकट्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अंधेरीच्या रेल्वे पुलावर फुकटे प्रवासी अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. मेट्रो रेल्वे आणि अंधेरी पादचारी पुलाला जोडणार्‍या स्कायवॉकचा या फुकट्यांकडून वापर होत आहे. तिकीट तपासणीसांनीही ही बाब मान्य केली आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दोन माध्यमांना जोडणार्‍या पादचारी पुलाव्यतिरिक्त मेट्रो स्थानकाकडे अजून एका मार्गाद्वारे अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या रस्त्याकडे येता येते. 'लोकांना जर का पूल ओलांडायचा असेल तर त्यांना या पुलापुढे असलेला सार्वजनिक पादचारी पुलाचा वापर करावा लागतो. तसेच ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचा पूल संपतो आणि रेल्वेचा पादचारी पूल सुरू होतो त्या जंक्शनवर ऑटोमॅटीक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम) आणि सीव्हीएम बसविण्यात आल्या आहेत,' असे परेचे जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले.

Post Bottom Ad