मुंबई- अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिवाळी सणानिमित्त भेसळयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांची भेसळयुक्त मिठाई जप्त केली. ५ ऑक्टोबरपासून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत आटा, रवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, वनस्पती, घी, चॉकलेट व बेकरी प्रॉडक्ट तसेच सुकामेवा असे राज्यभरातून सुमारे साडे सातशेहून अधिक नमुने ‘एफडीए’ने गोळा केले आहेत.
दिवाळीत ६ हजार ८२ किलोची मिठाई एफडीएच्या अधिका-यांनी पकडली. जप्त केलेल्या मिठाईचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात मावायुक्त पदार्थांचा वापर करण्यात येतो. मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा फायदा घेत भेसळयुक्त पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. पदार्थांवर लेबल व इतर गोष्टी नियमानुसार दिसल्या नाहीत, तर असे पदार्थ भेसळयुक्त पदार्थ म्हणून जप्त केले जातात. राज्य व राज्याबाहेरून आवक होणाºया पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्यात येते.
दिवाळीपूर्वी व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येते. मोहिमेत अशा भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले जातात. तोपर्यंत जप्त करण्यात आलेला माल सील केला जातो. एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. दरम्यान, पुणे विभागात बुधवारी २५ लाख रुपये किंमतीचा गुटखाही पकडण्यात आला असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.