शेती, सहकार, कामगार, युवक, युवती, शिक्षण, नागरीकरण या क्षेत्रात योजना आणि घोषणांची जाहीरनाम्यात बरसात केली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे. शिक्षित युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र मनुष्यबळ विकास मंत्रालय स्थापन करण्याचा निर्धार पक्षातर्फे करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी नदीजोड कार्यक्रम राबविण्याचे आश्वासनही राष्ट्रवादीने दिले आहे. या जाहीरनाम्याच्या सुरवातीलाच राष्ट्रवादीने तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारने राज्याची घडी विस्कटल्याची टीका केली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बसवलेली घडी 1995 ते 1999 दरम्यानच्या युती सरकारने विस्कटली, असा आरोप जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
काय आहे जाहीरमान्यात?
- 65 वर्षांच्या अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन
- ठिबकच्या सिंचनाला 75 टक्के अनुदान
- मागेल त्याला कृषी पंपासाठी वीजजोडणी
- 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप
- औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे मोनोरेल सुरू करणार
- एक हजार किमी लांबीचे एक्स्प्रेस वे विकसित करणार
- मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी 2000 कोटींची गुंतवणूक
- प्रत्येक शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम
- सर्व महाविद्यालयांत मोफत वाय-फाय सेवा
- पोलिसांना हक्काचे घर देण्यासाठी मुंबईत दहा एकर जागा देणार
- महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करणार
- सर्व जिल्ह्यांत युवक वसतिगृहे
- मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी 2000 कोटींची तरतूद करणार
- अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक
- चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
- चिरानगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे स्मारक
- कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक
- मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक