समाजात तेढ निर्माण करून आपापसात लढायला लावणे हाच भाजप-शिवसेनेचा कार्यक्रम - सोनिया गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2014

समाजात तेढ निर्माण करून आपापसात लढायला लावणे हाच भाजप-शिवसेनेचा कार्यक्रम - सोनिया गांधी

कोल्हापूर- धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करून लोकांना आपापसात लढायला लावणे हाच भाजप-शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यांच्या अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज येथे आयोजित विराट प्रचार सभेत केले. महाराष्ट्र गुजरातपेक्षा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, याउलट महाराष्ट्रातील काही संस्थांची कार्यालये गुजरातला नेण्याचा भाजपचा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 


विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील मेरी वेदर मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सभेला कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जन खर्गे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. भोळ्या जनतेला जाळ्यात ओढले 

श्रीमती गांधी म्हणाल्या, ""लोकसभेच्या निवडणुकीत या लोकांनी मोठी स्वप्ने दाखवून भोळ्याभाबड्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढले. या निवडणुकीतही हाच "सिलसिला‘ या लोकांनी कायम ठेवला आहे. शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले, ते विचारले तर या लोकांना राग येत आहे. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची भाषा यांनी केली, त्याबद्दल विचारले तर ते बोलायला तयार नाहीत. परदेशातील काळा पैसा देशात आणण्याचा संकल्प त्यांनी केला; पण त्याचेही काही झाले नाही. रोजगार देण्याची भाषा केली; पण कोठे आहे, हा संकल्प असे विचारले तर त्यांना वाईट वाटते. 60 वर्षांत ज्यांनी काही केले नाही असे सांगत आमच्याकडे ते 60 दिवसांचा हिशेब मागतात, अशी ओरड करणाऱ्यांनी भोळ्याभाबड्या जनतेला मोठी मोठी स्वप्ने दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्याच लोकांनी तुमच्याकडे हिशेब मागितला तर तुम्ही एवढे हैराण का होता?‘‘ 

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रविरोधातच निर्णय घेण्यास सुरवात केल्याचा आरोप करून श्रीमती गांधी म्हणाल्या, ""महाराष्ट्रातील उद्योग व बऱ्याच संस्थांची कार्यालये गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीत त्यांचा एक रंग असतो व प्रत्यक्ष निवडणुका झाल्यानंतर ते स्वतःचे खरे स्वरूप दाखवतात. तशीच परिस्थिती लोकसभेनंतर देशात व महाराष्ट्रात दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे मुखवटे घालून लोकांसमोर येणाऱ्यांपासून आता सावध राहण्याची गरज आहे.‘‘ 

Post Bottom Ad