विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाला आता चांगलाच रंग चढू लागलाय. या महासंग्रामात मोठय़ा प्रमाणात ‘काळ्या मायेचा’ वापर होण्यास सुरुवात झाल्याने, याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक अनोखे मिशन सुरू केले आहे. अवैधरित्या बाळगणाऱया पैशांवर जप्ती घालण्याचे फर्मान पोलीस आयुक्तांनी काढले आहे. यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकात दोन अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचाऱयांचा समावेश केला गेलाय. शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार रात्रं-दिवस निवडून येण्यासाठी प्रचाराची राळ उडवत आहे. आश्वासने, आमिषे दाखवून मतदारांना भुलविण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात ‘अर्थ’कारण उमेदवारांच्या काही विश्वासू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. घरोघरी पैसे वाटण्याचा सिलसिलाही सुरू झाल्याच्या काही तक्रारी पोलीस आयुक्तांपर्यत पोहोचल्या आहेत. बाहेरूनसुद्धा मोठय़ा प्रमाणात अवैध पैसा शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी पायधुनी परिसरात 12 लाख 34 हजार रुपयांच्या रकमेसह एकाला अटक केली होती. मात्र ही रक्कम कोणाला देण्यासाठी आली आहे, याचा अद्याप तपास लागू शकला नाही.
तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी भांडुप परिसरात नाकाबंदीदरम्यान 25 लाख रुपयांसह तिघांना पोलिसांनी गजाआड केले. शनिवारी गोरेगाव परिसरात 93 लाख रुपये घेऊन जात असताना एक चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र ही रक्कम बँकेच्या एटीएमसाठी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र एवढय़ा रात्री एटीएममध्ये कोणती बँक पैसे टाकते का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागपाडा, मोहम्मद अली रोड येथे उमेदवार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यानी मोठय़ा प्रमाणात पैसे वाटण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी येथे साध्या वेशात कर्मचाऱयांचा ताफा तैनात केला आहे.
जे पथक स्थापन केले आहे, ते पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्यामुळे मा]िहती मिळताच शहरातील कोणत्याही ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. यामुळे निवडणुकीच्या या रणधुमाळीत काळ्या मायेला चाप बसण्याची शक्यता पोलीस दलातून व्यक्त करण्यात येत आहे.