मुंबई- मास्टर ब्लास्टर व राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकर याने आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी सुरु केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'त सचिनला सहभागी होण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार सचिनने त्यात सहभाग घेऊन मोदींच्या मोहिमेला साथ दिली होती. याबाबत पुढे काय करता येईल याबाबत दोघांत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
याचबरोबर मोदींनी सुरु केलेल्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'तंर्गत सचिन तेंडुलकर एक गाव दत्तक घेणार आहे. देशातील सर्व खासदारांनी प्रत्येक वर्षी एक गाव दत्तक घेऊन आदर्श गाव करावे अशी संकल्पना मोदींनी मांडली आहे. त्याअंतर्गत खासदारांना 20 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबत सचिनने गाव दत्तक घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून पंतप्रधान मोदींना याबाबतची माहिती आजच्या भेटीत दिली. या योजनेत सहभागी होत असल्याबाबत मोदींनी सचिनचे आभार मानले व शुभेच्छा दिल्या. मोदींनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे.