'कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र' शक्‍यच नाही - राहुल गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

'कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र' शक्‍यच नाही - राहुल गांधी

दिंडोरी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र‘ घोषणेसंदर्भात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेस पक्षाची व महाराष्ट्राची वैचारिक संरचना एकच असल्याने ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र‘ होणे कधीच शक्‍य नाही, असे गांधी यांनी सांगितले. 

"कॉंग्रेस पक्षाची महाराष्ट्रामधून हकालपट्टी करा, असे भाजप नेते सांगतात. मात्र कॉंग्रेसची विचारसरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक नसल्याची बाब त्यांनी ध्यानी घ्यावी,‘‘ असे गांधी नाशिकजवळील दिंडोरी येथील प्रचारसभेत बोलताना सांगितले. यावेळी गांधी यांनी केंद्र सरकार हे उद्योगपतींसाठी व गरीबांविरोधात काम करत असल्याचा आरोप केला. 

"आम्ही गरीबांच्या बॅंक खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याची योजना सुरु केली. आज केंद्र सरकार हीच योजना पुढे चालवित आहेत. मात्र यामध्ये एक मोठा फरक आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेला जाण्याआधी उद्योगपतींच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन औषधांच्या किंमतींवरील निर्बंध हटविण्याची मागणी केली. या बंद दाराआड झालेल्या करारानंतर कर्करोगासाठी असलेल्या औषधाची किंमत 8 हजारावरुन तब्बल एक लाख इतकी झाली आहे. तुमच्या खिशामधील पैसा हा थेट उद्योगपतींच्या खिशात जाऊ लागला आहे,‘‘ असे गांधी म्हणाले. 

मोदी यांच्या ‘अच्छे दिन..‘ घोषणेवरही गांधी यांनी यावेळी टीका केली. ""लोकसभा निवडणुकीवेळी मोदी यांनी भारत हा पाकिस्तानला धडा शिकवेल, असे वक्तव्य केले होते. आता पाकिस्तान आपल्या जवानांवर गोळीबार करत आहे. लहान मुलांचा मृत्यु होत आहे आणि लवकरच सर्व काही सुरळित होईल, असे सांगण्यात येत आहे. अच्छे दिन कधी येतील?,‘‘ असे गांधी म्हणाले. 

Post Bottom Ad