काँग्रेस पुन्हा उभे राहणे कठीण - योगेंद्र यादव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

काँग्रेस पुन्हा उभे राहणे कठीण - योगेंद्र यादव

काँग्रेसची देशभरात झालेली वाताहत पाहता हा पक्ष पुन्हा उभा राहणे फारच कठीण असल्याचे मत राजकीय विश्लेषक व आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. या देशात कोणताही पक्ष संपत नाही. मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ४४ खासदारांचा काँग्रेस पक्ष पुढील पाच वर्षांमध्ये उठून उभा राहील का, याबाबत आपल्याला शंका असल्याचे यादव म्हणाले. 

ज्याला देशात मोदी लाट या नावाने संबोधले जाते तो नक्की काय प्रकार आहे, हे समजावून सांगताना यादव म्हणाले की, राज्य कारभार, आर्थिक धोरणे व सांस्कृतिक धोरणे या तीनही पातळ्यांवर यूपीए सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने तयार झालेली पोकळी मोदी यांनी भरून काढली.

सरकारने कल्याणकारी म्हणून जी आर्थिक धोरणे राबवली ती प्रत्यक्षात सामान्य जनतेपर्यंत न पोहोचल्याचा परिणामही जनतेच्या मनावर खोलवर झाला होता. तसेच सांस्कृतिक पातळीवर देशातील उच्चभ्रू इंग्रजी भाषिक सेक्युलर विचारवंतांच्या परिभाषेमुळे बहुसंख्यांक समाजात उद्वेगाची भावना धुमसत होती. या सगळ्या परिस्थितीला मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी जी यंत्रणा लागते, ती नरेंद्र मोदी व त्यांचे उजवे हात अमित शहा यांनी प्रभावीपणे राबवली. प्रचंड पैसा व प्रसारमाध्यमांवरील पकड यांच्याद्वारे त्यांनी देशभरात मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले, असे यादव म्हणाले.

काँग्रेसला ज्या राज्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळतात, त्या राज्यांमध्ये काँग्रेस पुन्हा उठून उभा राहणे अशक्य होते. तसेच सध्या जे काँग्रेसचे नेतृत्व आहे, त्यामध्ये इंदिरा गांधींसारखी शुन्यातून झेप घेत भविष्य घडविण्याची उमेदही बिलकूलच दिसत नाही, असेही यादव म्हणाले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील जनतेची नस पकडता आली नाही. त्यांच्या धोरणांमध्ये जनतेला आश्वासक वाटेल, असे काहीही नव्हते. कठोरपणे प्रशासन हाकणारा व बहुसंख्याकांना संस्कृतीचा रक्षक वाटणाऱ्या मोदींना जनतेने उचलून धरले, असेही यादव यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad