मुंबई / प्रतिनिधी
घाटकोपर येथील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याच्या दुकानात हिरे खरेदीच्या बहाण्याने येऊन नव्वद लाखांचे हिरे लांबवणाऱ्या तिघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या कक्ष-7 च्या पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली. धीरूभाई मुंजीभाई पटेल (52) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या हिऱ्यांपैकी वीस लाखांचे हिरे जप्त केले आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
घाटकोपर पूर्वेला महात्मा गांधी रोडवर असलेल्या हिरे व्यापाऱ्याकडे 23 सप्टेंबरला तीन जण हिरे खरेदीसाठी आले. हिरे पाहत असताना हातचलाखीने त्यांनी खरे हिरे लांबवत खाकी रंगाच्या पाकिटात खोटे हिरे ठेवले. त्यानंतर किंमतीवरून घासाघीस करत सौदा मोडला आणि तेथून ते तिघेही निघून गेले. हिरे व्यापाऱ्याला संशय आल्यावर त्याने खाकी रंगाच्या पाकिटात ठेवलेले हिरे पुन्हा तपासले. ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्याने याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हे शाखेच्या कक्ष-7 च्या पोलिसांकडून हा तपास सुरू होता. दुकानात बसवलेल्या सीसी टीव्हीची पाहणी केल्यावर तिघांची हातचलाखी सीसी टीव्हीत उघड झाली. या तिघांचेही चित्र अस्पष्ट असल्याने पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे हिऱ्यांचे सौदे होणाऱ्या सर्व ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. कक्ष-7 च्या पोलिसांचे एक पथक गुजरातच्या सुरत, अहमदाबाद, वडोदरा, अमरेली, भावनगर, राजकोट येथे गेले. अहमदाबाद येथील हिरे व्यावसायिकांना हे फुटेज दाखवल्यावर त्यातील एक आरोपी अहमदाबादमध्येच असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी दबा धरून धीरूभाई मुंजीभाई पटेल (52,रा.सुरत) याला अटक केली. चोरी केलेले हिरे विकण्यासाठी तो या परिसरात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संजय सुर्वे, एपीआय अनिल ढोले, संतोष सावंत, विजय कदम, प्रवीण पाटील, सपना क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.