मुंबई (प्रतिनिधी)- झोपडपट्टी किंवा उच्चभ्रू वस्तीमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्यास कारवाई करण्याची घोषणा वैद्यकिय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी केली. मात्र, कारवाईचे संकेत पोकळ असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. दिवसभरात एकही खटला भरला नसल्याचे सांगताना किटकनाशक विभागाकडून आकडेवारीच मिळाली नसल्याची सारवासारव केली. तसेच तीन दिवसानंतर कारवाई करण्याचे स्पष्ट केले.
शहरात डेंग्युने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस डेंगी रुग्णांमध्ये वाढ होते. परिणामी, डेंगींचा नायनाट करण्यासाठी पालिकेचे वैद्यकिय विभाग जागंजाग पझाडले. मात्र, तरीही डेंग्युचे प्रमाण कमी होत नसल्याने पालिकेच्या स्थायी समितीत डॉ. नागदा यांनी नामी युक्ती काढली. डेंग्यु सापडणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना चक्क अटक करण्याचे धोरण योजिले. शुक्रवार पासून कारवाईला सुरुवात करण्याचे जाहीर केले. परंतु, दिवसभरात एकाही नागरिकावर खटला भरण्यात आला नसल्याचे समोर आले. याचे खापर डॉ. नागदा यांनी किटकनाशक आणि सेंट्रल पचर्स विभागावर फोडले.
पालिकेचे किटकनाशक विभाग, आरोग्य पथक आणि सेट्रल पचर्स विभागाला डेंगीच्या अळ्या सापडणाऱ्या ठिकाणांची माहिती देण्याचे आदेश पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिले आहेत. त्यानुसार, कर्मचारी कामाला लागले आहेत. याबाबतचा अहवाल तीन दिवसानंतर पालिकेला सादर केला जाणार असून त्यानंतर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे डॉ. नागदा म्हणाल्या.