मुंबई- भाजपने स्वबळाचा नारा देत शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडली खरी पण त्यांचा हा डाव त्यांच्याच अंगाशी येणार असल्याचे चित्र मुंबईसह राज्यातील शहरी भागात निर्माण झाले आहे. भाजपने राज्यातील एकाही नेत्यांना पुढे न करता मोदी-शहांना पुढे केल्याने शिवसेना-मनसेने मराठी अस्मिता पुढे करीत भाजपला खिंडीत गाठले आहे. आता तर मुंबईत शिवसेना-मनसे यांच्यात 'समझोता' झाल्याच्या चर्चेने तर भाजपच्या नेत्यांची व खासकरून मुंबईतील उमेदवारांची हवा टाईट झाली आहे. मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती असा संघर्ष सध्या शिगेला पोहचला आहे. व्हॉटसअॅप, फेसबुकवर सेना-मनसेकडून मोदी-शहांसह गुजराती प्रवृत्तीवर जोरादर मॅसेज पाठवून प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मुंबईतील मराठी घरांघरात याची खमंग चर्चा सुरु असून भाजपला याची जबरी किंमत मोजावी लागेल असेच एकून चित्र आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारासाठी आता केवळ 8 दिवसच उरले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र नेत्यांची भाषणे, सभा आणि टीका-टिप्पणी असाच महौल बनला आहे. यंदा सर्वाधिक टीका भाजपवर होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादींसह युती तोडल्याने आता शिवसेनाही भाजपविरोधात आग ओकत आहे. मोदींचे प्रशंसक असलेले राज ठाकरेंही आता मोदी-शहा व भाजपवर तुफानी हल्लाबोल करू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. सध्या भाजप राज्यातील 'व्हिलन' पक्ष ठरत आहे. भाजपच्या प्रत्येक कृतीवर विरोधक तुटून पडत आहेत. यामुळे राज्यातील भाजप नेते हैरान आहेत. भाजपचे नेते, प्रवक्ते टीव्हीवर प्रतिक्रिया द्यायला सर्वात पुढे असतात पण आता ते गायब झाले आहेत. एकूनच भाजप सध्या बॅकफूटवर आहे. मित्रपक्ष असलेले नेते जानकर- आठवले- शेट्टी गायब आहेत. ते राज्यातच आहेत ना अशी स्थिती आहे.
उद्धव आणि राज ठाकरेंनी मोदी-शहांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या टीकेला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच मुंबईत शिवसेना- मनसेत समझोता झाल्याची चर्चा आहे. सेना-मनसेतील दुस-या फळीतील नेते ठरवून प्रचार करीत असल्याचे चित्र असल्याचे जागोजागी दिसत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार प्रबळ तेथे सेनेचे काम तर जेथे मनसेचा उमेदवार ताकदीचा आहे तेथे मनसेचा उमेदवार निवडणूक आणण्याची रणनिती या नेत्यांनी आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.