... तर 'व्हॉटस्‌ऍप'चा ग्रुप ऍडमिन जबाबदार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2014

... तर 'व्हॉटस्‌ऍप'चा ग्रुप ऍडमिन जबाबदार

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्टची संख्या सोशल नेटवर्किंग साईटवर वाढली आहे. त्या रोखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून, त्यामुळे अशा पोस्टस्‌ व्हॉटस्‌ऍपवर प्रसारित झाल्यास ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरण्यात येणार आहे. 
निवडणूक प्रचाराचा धुराळा "व्हॉट्‌सऍप‘, "फेसबुक‘ सारख्या साइट्‌सवरही उमटत आहे. विशेषतः "व्हॉट्‌सऍप‘वर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे, तसेच विशिष्ट राजकीय पक्ष, राजकारण्यांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसारित करण्याचे प्रमाण वाढले. अशा "पोस्टस्‌‘ कुठलीही खातरजमा न करता जशाच्या तशा पुढे पाठवल्या जातात. त्यामुळे "व्हॉट्‌सऍप‘च्या ग्रुप ऍडमीनची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मजकूर येणार नाही, तसेच ग्रुपमधून प्रसारितही होणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना ग्रुपमध्ये समाविष्ट करू नये. त्यांनी आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्यास ऍडमीनला जबाबदार धरले जाऊ शकते.

आर्थिक गुन्हे शाखा व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे म्हणाले, ‘आक्षेपार्ह मजकूर किंवा छायाचित्र प्रसारित करणाऱ्यांवर सायबर कायद्यानुसार कारवाई होतेच. मात्र, एखाद्या ग्रुपमधून असा मजकूर प्रसारित झाल्यास संबंधित ग्रुप ऍडमिनलाही जबाबदार धरले जाऊ शकते.‘‘

सायबर लॉयर जयश्री नांगरे म्हणाल्या, ‘व्हॉट्‌सऍपवरून पाठवलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्यास बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याबद्दल आरोपीवर खटला दाखल करता येतो. आरोपीला 7 दिवसांपासून ते 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 3 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक दंडाची तरतूद या शिक्षेत आहे. मजकूर ज्या ग्रूपमधून प्रसारित झाला त्याचा ऍडमीन व मजकूर प्रसारित करणारी व्यक्ती दोघेही शिक्षेस पात्र ठरतात.‘‘

Post Bottom Ad