१८ कलाकारांनी १३ ते १४ तास मेहनत घेऊन या रांगोळ्या काढलेल्या आहेत. रांगोळी प्रदर्शन भरवण्याआधी वैद्य यांनी आपल्या कलाकारांबरोबर बैठक घेतली. प्रत्येकाला विषय सुचवण्यास सांगितले. त्यानुसार चालू घडामोडींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. विषय निश्चित करण्यात आले. काव्यरचना तयार करण्यात आल्या. हेमंत रणपीसे यांच्या या काव्यरचना असून शिवसेना-भाजपची ताटातूट, कोवळ्या कळ्या, जय मल्हार, गाजलेला टाईमपास, बालमजूर असे विविध विषय रांगोळ्यांमध्ये घेण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी १४ तास न थांबता जीव ओतून या रांगोळ्या काढण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले.
हे रांगोळी प्रदर्शन म्युनिसिपल मराठी शाळा नं १, जयंतीलाल वैष्णव रोड (खोत गल्ली), घाटकोपर (प.), मुंबई-८६ या ठिकाणी भरले असून ते २८ तारखेपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३०पर्यंत खुले राहील. या रांगोळ्यांमध्ये काही खास आकर्षण असणार्या रांगोळ्याही आहेत. प्रकाश आमटे यांची रांगोळी, गाजलेल्या ‘टाईमपास’ या चित्रपटातील प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांची रांगोळी. झी मराठीवरच्या ‘जय मल्हार’ या मालिकेतील देवदत्त नागे याची मल्हारच्या रूपातील रांगोळी यंदाचे खास आकर्षण ठरल्या आहेत.