मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारसभांचा धडाका येत्या शनिवारपासून (दि. 4 ऑक्टोबर) सुरू होत असून मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रचारसभेची जय्यत तयारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे.
शनिवारी पहिल्याच दिवशी मोदी यांच्या कोल्हापूर, बीड व मुंबई अशा तीन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. याशिवाय, राज्य विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी यांच्या एकूण 22 सभा होतील, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.`छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊया मोदींना साथ’ या होर्डिंग्ज्वर आतापर्यंत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो झळकत होते. आता मोदींसोबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो झळकू लागले असून पक्षात फडणवीस यांचेही राजकीय वजन वाढल्याचे हे संकेत असल्याची चर्चा पक्षीय वर्तुळात आहे.
सुप्रसिध्द गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील `एकमुखाने आता देऊया, मोदीजींना साथ’ या गाण्याच्या निवडणूक प्रचार सीडीचे प्रकाशन केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जावडेकर म्हणाले, भाजपने निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्याचे ठरविले आहे. मोबाईलवरून भाजपच्या प्रचाराच्या तीन कोटी पोस्ट पाठविल्या जाणार आहेत. लोककला, पथनाटय़ासह डीजिटल कॅम्पेनवरही भाजपने भर दिला आहे. भाजपच्या दीडशे व्हीडिओ व्हॅन्स राज्याच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागाचे सचिव आशिष वसंत मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.