नारायण राणे यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2014

नारायण राणे यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रचार समितीप्रमुख आणि कोकणातील 'दादा' नेते नारायण राणे यांचा बालेकिल्ला शिवसेनेने अखेर उद्ध्वस्त केला आहे. कुडाळ मतदारसंघात गेल्यावेळी अवघ्या २५ हजार मतांनी पराभूत झालेल्या शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी १० हजारांहून अधिक मतांनी राणे यांच्यावर विजय मिळवला असून राणेंच्या राजकीय कारकीर्दीतील हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 

कोकणातील कुडाळ मतदारसंघाकडे यावेळी सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर आघाडी घेत राणे यांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. त्यानंतर ही आघाडी तोडत राणे यांनी आघाडी घेतली खरी पण ही आघाडी क्षणिक ठरली. नाईक यांनी पुढच्या काही फेऱ्यांमध्येच आघाडी मोडीत काढून विजयाकडे वाटचाल सुरू केली. फेरीगणिक ही आघाडी वाढतच गेली आणि राणे यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. नाईक यांनी १० हजार २०३ मतांनी विजय मिळवला. हा निकाल राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे. 

विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर राणे हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यांच्याकडे हायकमांडने प्रचार समिती प्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. काँग्रेसचे ते स्टार प्रचारकही होते. मात्र, राणे आपल्या या अस्तित्वाच्या लढाईत पास होऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे शिवसेनेने राणेंच्या कोकणातील 'दादा'गिरी सुरूंग लावण्याचे आपले स्वप्न या विजयाने पूर्ण केले आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असतानापासून सुरू झालेली राणे विरूद्ध शिवसेना ही लढाई अखेर शिवसेनेने आज खऱ्या अर्थाने जिंकली.या विजयानंतर वैभव नाईक यांनी हा सर्वसामान्य जनतेचा आणि शिवसैनिकांच्या सघर्षाचा विजय असून आज श्रीधर नाईक यांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 

Post Bottom Ad