खर्चाच्या नियमाचे पालन न केल्यास उमेदवारी बाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2014

खर्चाच्या नियमाचे पालन न केल्यास उमेदवारी बाद

मतदाराला स्क्रीनवर दिसणार दिलेले मत!
मुंबई / प्रतिनिधी 
निवडणुकीत पाण्याप्रमाणे पैसे खर्च करणाऱ्या उमेदवारांवर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला या खर्चासाठी बॅंकेत नवीन खाते उघडण्याचे बंधन घातले आहे. याच खात्यातून निवडणुकीचा सर्व खर्च करावयाचा आहे. 20 हजारांपेक्षा अधिक खर्च असल्यास तो धनादेशाद्वारे करावा लागणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास उमेदवारी बाद करण्याचा अधिकार आयोगाला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

बोगस मतदानासाठी राजकीय पक्षांकडून मशिनमध्ये सेटिंग होत असल्याचे आरोप होत असतात. त्यामुळे मतदान केल्यानंतर आपले मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच मिळाले का, असा प्रश्‍न मतदारांना पडतो. याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने चार हजार मतदान केंद्रांत "वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल‘ (व्हीव्हीपॅट) या आधुनिक यंत्रणेचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदाराने मतदान करताच शेजारच्या व्हीव्हीपॅट यंत्रावर आपले मत कोणाला मिळाले, हे मतदाराला सात सेकंद दिसणार आहे. 

ईव्हीएम मशिनच्या एका चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, अशा तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. यावर तोडगा म्हणून आयोगाने इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील 13 विधानसभा मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद (107), औरंगाबाद पश्‍चिम (108), औरंगाबाद पूर्व (109), अमरावती (38), अचलपूर (42), नाशिक सेंट्रल (124), नाशिक पश्‍चिम (125), नाशिक पूर्व (123), चंद्रपूर (71), वर्धा (47), यवतमाळ (78), अहमदनगर शहर (225) आणि भंडारा (61) या मतदारसंघांत ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे. 

या नव्या प्रयोगासाठी 5500 व्हीव्हीपॅट यंत्रे राज्यात आणण्यात आली आहेत. तीन हजार 942 मतदान केंद्रे असून, त्यात आणखी 200 केंद्रांची भर पडू शकते. काही पॅट यंत्रे देण्यात आली असून ती कशी हाताळावीत, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान यंत्रावरील पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण दाबताच शेजारी ठेवलेल्या पॅट यंत्रावर मतदानाची माहिती क्षणार्धात झळकते. ही माहिती सात सेकंद दिसत राहते. प्रत्येक मतदाराला आपला अनुक्रमांक, मतदान चिन्ह; तसेच आपले नावही दिसेल. ही यंत्रणा यापूर्वी नागालॅंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कोलकता या ठिकाणी वापरण्यात आली होती. 

Post Bottom Ad