मालाड खाडी येथे जलवाहिनी टाकण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2014

मालाड खाडी येथे जलवाहिनी टाकण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मालाड पश्‍चिम येथे १२00 मिलीमीटर व्यासाची मृदू पोलादी जलवाहिनी सूक्ष्म बोगदा पद्धतीने टाकण्यास केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. हा बोगदा खोदण्यासाठी 'कोस्टल रेग्युलेटरी झोन' कायद्याची अडचण येत असल्यामुळे हे काम सुरू करण्याआधी या मंत्रालयाकडून मंजुरी मिळणे अत्यंत आवश्यक होते.
 
मालाड येथे १२00 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी सुरू केले आहे. ही जलवाहिनी टाकण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालाड, गोराई आणि मार्वे जेटी येथील रहिवाशांना चांगल्या दाबाने पाणी मिळणार आहे. छोटे बोगदे खणण्यासाठी सूक्ष्म बोगदा पद्धत (मायक्रो टनेलिंग मेथड) वापरण्यात येते. 'मालाड येथे ही जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली असून यासाठी जमिनीखाली ३0 ते ४0 मीटर खोल 'पॅच' खणण्यात येणार आहे. पण जमिनीखाली इतक्या खोलीवर मनुष्यबळ पोहोचणे अशक्य असल्याने 'मायक्रो टनेलिंग मेथड' वापरण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे उप जल अभियंता (नियोजन आणि नियंत्रण) अशोककुमार तवाडिया यांनी दिली. या कामाला एव्हरशाईन नगरपासून सुरुवात होणार असून मालाड खाडी परिसरातील खारफुटीला या कामामुळे कोणताही धक्का पोहचू नये म्हणून लगून क्रॉस रोडपर्यंत करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच हजार चौरस फूट विस्तीर्ण परिसरात खारफुटी पसरली आहे आणि तिला वन मंत्रालयाने संरक्षित जाहीर केले असल्यामुळे तिची कत्तल होता कामा नये, याची काळजी महापालिकेने घेतली आहे, असे तवाडिया म्हणाले. 

Post Bottom Ad