एरियल शिडीच्या दुरुस्तीच्या खर्चाचे अग्निशमन अधिकार्‍यांकडून सर्मथन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2014

एरियल शिडीच्या दुरुस्तीच्या खर्चाचे अग्निशमन अधिकार्‍यांकडून सर्मथन

मुंबई अग्मिशमन दलातील ४२ मीटर उंचीच्या 'एरियल लॅडर प्लॅटफॉर्म'चा गेल्या १५ वर्षांत आगीच्या ३९६ वर्दींवर, ११७ ठिकाणी इतर कारणांसाठी तसेच १0८ ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. या 'लॅडर'चे आयुष्यमान १५ ते २0 वर्षांचे असून, साडेतीन कोटी रुपये खचरून तिची दुरुस्ती व नूतनीकरण केल्यास ती आणखी पाच ते सात वर्षे सेवा देण्यास सक्षम होईल, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकार्‍यांनी दिली. 
या शिडीची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी ती फिनलंडला पाठवण्यावरून स्थायी समितीच्या ३0 मे २0१४ रोजी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे दिलीप लांडे, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे आणि प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेतले होते. ही ४२ मीटरची स्काय लिफ्ट १५ वर्षांपूर्वी सव्वाचार कोटी रुपयांना खरेदी केली होती. १५ वर्षानंतर ती फिनलंडला पाठवण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे. या लॅडरची आताची किंमत साडेसहा कोटी रुपये असताना, तिच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यामागे प्रशासन मुंबईकरांचे एवढे पैसे का घालवत आहे? ही लिफ्ट परदेशात पाठवण्यामागे प्रशासनाचे काही हितसंबंध आहेत, असा आरोप आंबेरकर यांनी केला होता. ४२ मीटर उंचीच्या अग्निशमन दलाकडे चार शिड्या असून, नवीन शिडीची किंमत सव्वासहा कोटी असताना, त्यांच्या दुरुस्तीसाठी कार्यशाळा का बनवत नाही, तंत्रज्ञ का नेमत नाही, किलरेस्कर आणि एल अँड टीसारख्या कंपन्या असून, त्यांच्याकडे हायड्रॉलिक तंत्रज्ञान आहे. 

ही शिडी दुरुस्तीसाठी पाठवण्याची गरज काय, शिडीचे नूतनीकरण करणार म्हणजे नक्की काय करणार, असे आक्षेपवजा मुद्दे समितीच्या सदस्यांनी उपस्थित केले होते. या शिडीची दुरुस्ती व नूतनीकरण मोठय़ा स्वरूपाचे असल्यामुळे ते अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत करणे शक्य होणार नाही व त्यामुळे या लॅडरच्या उत्पादकांकडे पाठवण्यात येणार आहे. अशा प्रकारची वाहने ही भारतामध्ये बनवत नसल्यामुळे किलरेस्कर किंवा लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्यासुद्धा ही वाहने बनवत नाहीत आणि दुरुस्तीही करत नाहीत, असे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट के ले आहे. या शिडीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च येणार असून, त्याच्या दुरुस्तीनंतर ते पुढील सात ते आठ वर्षांसाठी सेवा देण्यास सक्षम होणार आहे. यामुळे तिची दुरुस्ती करून घेणे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, असा दावा प्रमुख अग्निशमन अधिकार्‍यांनी केला आहे.

Post Bottom Ad