पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेत वाढ करण्याचे संकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेत वाढ करण्याचे संकेत

पावसाळ्याच्या दिवसात तुंबणाऱ्या पाण्यापासून गोरेगाव पश्चिममधील नागरिकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. गोरेगावातील जुन्या पम्पिंग स्टेशनचे नूतनीकरण करून पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेत वाढ करण्याचे संकेत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मंगळवारी मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आयुक्त सीताराम कुंटे यांनी पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी भेट देऊन मोहिमेत भाग घेतला. गोरेगाव पश्चिम पी-दक्षिण प्रभागातील नागरी समस्यांच्या प्रश्नांवर कुंटे यांनी लक्ष घातले. मुसळधार पावसात भरतीची वेळ असल्यास ओशिवरा नदी ओसंडून वाहते. त्यामुळे मोतीलालनगर १, भगतसिंगनगर १, २, ३ आणि लक्ष्मीनगर लिंक रोडचा परिसर पाण्याखाली जातो.

गोरेगावातील हे परिसर दलदलीचे व सखल भाग असल्यामुळे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे येथील पम्पिंग स्टेशनचे नूतनीकरण आवश्यक असून, पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेत वाढ करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. आयुक्तांनी त्यावर अर्थसंकल्पात तरतूद करून ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश दिले आहेत.

ओशिवरा नदीला लागून अवैध झोपड्या वसल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलदगतीने होत नाही. या अवैध झोपड्या पाडण्याचे आदेशही त्यांनी सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांना दिले. प्रभाग क्र. ५१ मध्ये मुंबई स्वच्छता प्रबोधन अभियान अंतर्गत समाधानकारक साफसफाई होत नसल्याची तक्रारी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली. काम न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली.

Post Bottom Ad