स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्यात आला आहे.
पहिल्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री नसणार
३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे नड्डा म्हणाले. सुरुवातीला छोटेखानी मंत्रिमंडळ असणार आहे. परंतु या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला सरकारमध्ये सामिल होण्याची आमची मनापासून इच्छा आहे. सरकारमध्ये सामिल होण्याबाबत सध्या शिवसेना नेत्यांसोबत चर्चा सुरु असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना सामावून घेतले जाईल, असं नड्डा म्हणाले.
फडणवीस यांचा परिचय
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, एक अभ्यासू, मनमिळावू नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखले जाते. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.