आमदार अन्‌ खासदार शब्द घटनेत नाहीच ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2014

आमदार अन्‌ खासदार शब्द घटनेत नाहीच !

विधानसभा-विधान परिषद आणि लोकसभा-राज्यसभेत निवड झालेल्या लोकप्रतिनिधींना किंवा सदस्यांना आमदार आणि खासदार म्हणण्याची प्रथा महाराष्ट्रातच आहे. मात्र, सदस्यांना आमदार व खासदार ही बिरुदे कधी मिळाली हे निश्‍चित नाही. 

यावर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपला आमदार, जिवाभावाचा आमदार, मी आमदार, जनतेचा आमदार यांसारखे अनेक शब्द प्रचारामुळे मतदारांच्या कानावर पडू लागले आहेत. घटनेनुसार आमदार किंवा खासदारांना त्या-त्या सदनाचे सदस्य म्हटले जाते. मग आमदार आणि खासदार हे शब्द आले कुठून? याबाबत कोणीही ठाम सांगू शकत नाही.

भारतावर मुघलांनी बरेच वर्षे राज्य केले आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्‍न ऐकून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता मुघल बादशाह शाहजहॉंने 1627 मध्ये दिवान-ए-आम सुरू केले होते. या सभागृहात शाहजहॉं जनतेचे प्रश्‍न ऐकून घेत त्यांच्याशी चर्चाही करत असे. शाहाजहॉंनने तयार केलेल्या ही दिवाण- ए- आम या इमारतीच्या मध्यभागी मयूर सिंहासन होते. या ठिकाणी बादशाह आपल्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करीत असे. याच प्रकारची रचना दिवाण-ए-खासचीही होते. येथे विशिष्ट वर्गातील लोकांचे प्रश्‍न ऐकून त्यावर तोडगा काढला जायचा. 

1935 मध्ये मुंबई प्रांतात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए- खासवरून अनुक्रमे आमदार आणि खासदार हे शब्द प्रचलित झाले असावे, असा कयास आहे. विशेष म्हणजे, आमदार आणि खासदार हे शब्द केवळ महाराष्ट्र राज्यातच रूढ आहेत. 

महाराष्ट्र वगळता हिंदी बहुल राज्यांत आमदार आणि खासदाराला अनुक्रमे विधायक आणि सांसद असे शब्द वापरले जातात. घटनेच्या लेखी विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य हेच शब्द अधिकृत आहेत. 

‘आमदार आणि खासदार हे शब्द सदनांच्या सदस्यांना कधीपासून रूढ झाले, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही. मुघल दरबारातील दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खासवरून हे शब्द आले असावेत. ढोबळमानाने 1935मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान हे शब्द बोलण्यात वापरले जाऊ लागले. महाराष्ट्र वगळता कोठेही हे शब्द वापरले जात नाहीत, हे विशेष.‘
प्रा. जयदेव डोळे, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

‘घटनेत खासदार व आमदार असा उल्लेख असलेले शब्द नाहीत. त्याऐवजी संसद सदस्य व विधिमंडळ सदस्य, असा उल्लेख घटनेत आहे. महाराष्ट्र राज्यात हे शब्द रूढ झाले असले तरी ते कधीपासून वापरात आहेत, हे निश्‍चित सांगता येत नाही.‘
कृष्णा भोगे, निवृत्त सनदी अधिकारी, औरंगाबाद.

Post Bottom Ad