मुंबई - शिवसेनेचं ताळतंत्र सुटले आहे अशी टीका केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. उद्धव व राज ठाकरे हे दोघेही शरद पवारांच्या सुरात सूर मिसळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करणारी भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला उत्तर देताना जावडेकरांनी सेनेला टोला लगावला आहे. राज्यात आमचेच सरकार येणार आहे हे दिसत असल्याने पराभवाच्या भीतीने ताळतंत्र सुटल्याने ते अशी टीका करत आहेत, असा टोला त्यांनी हाणला. राज्यात गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मात्र सेना एक शब्दही उच्चारत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीका केली.पंतप्रधान मोदी इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत असा टोला त्यांनी राज यांचे नाव न घेता लगावला. सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात दंग आहेेेेत ही शोकांतिक असल्याची टीका राज यांनी एका सभेत केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जावडेकरांनी पंतप्रधान उशीरापर्यंत झोपून रहात नाहीत, तर सकाळी लवकर उठून काम करतात आणि ११ वाजता सभा घेतात असे सांगत राज यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आमचा लढा मात्र आघाडी सरकारशी असून १५ वर्षांची ही जुलमी राजवट संपवणं, महाराष्ट्राला न्याय देणं आणि राज्याचा विकास करणे हेच आमचे निवडणुकीतील मुद्दे आहेत असे त्यांनी सांगितले. भाजपाविरोधात कोणीही कितीही प्रचार केला तरी आम्ही सकारात्मक भाषण करून, बहुमताने निवडणूक जिंकून महाराष्ट्रात सरकार स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.