मुंबई उपनगरातील २६ विधानसभा मतदाससंघांमध्ये एकूण ७३४६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ९४१ मतदान केंद्रे क्रिटीकल अर्थात संवेदनशील आहेत. या ९४१ मतदान केंद्रांपैकी ३१३ म्हणजेच ३३ टक्के मतदान केंद्रे एकट्या गोरेगावमध्ये असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२६ विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीच्या रिंगणात ३८0 उमेदवार असून पुरुष मतदार ४२ लाख ६५ हजार ६८२ तर महिला मतदार ३४ लाख ७८ हजार 0२१ असे एकूण ७७ लाख ४३ हजार ८३९ मतदार आहेत. जेथे १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत. अशा भांडुप, घाटकोपर, मानखुर्द, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दिंडोशी, गोरेगाव येथे डबल बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. क्रिटीकल मतदान केंद्रांमध्ये गोरेगावनंतर जोगेश्वरी पूर्व येथील १७९ मतदान केंद्रे, १६७ विलेपार्ले येथील १२६ मतदान केंद्रे, व इतर विधानसभा मतदारसंघातील १ ते ४३ मतदान केंद्रांचा क्रिटीकलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
उपनगरातील भरारी पथके, स्टॅटीस सर्व्हिसेस टीम, व्हिडीओ रेकॉर्डिंग, व्हिडीओ व्हिविंग या पथकांच्या कारवाईतील ३३ प्रकरणात तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय भिंती विद्रुपीकरणाची १0२0, ७२१ पोस्टर्स, १५१६ बॅनर्स आणि अन्य १४२४ अशा एकूण ४६८१ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहेत. खाजगी विद्रुपीकरणाची ३८७ प्रकरणांची तक्रार करण्यात आली होती. ध्वनिक्षेपण यंत्राचे १, बेकायदेशीर सभा व भाषणे, अशी जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड पश्चिम, वर्साेवा येथील ४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, तर गाड्यांचा गैरवापर याबाबतच्या एकूण ५ प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगरामध्ये एकूण २ कोटी ५८ लाख, ८५ हजार, ८५0 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४९ लाख ९३ हजार ७२९ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. एकूण ४२२ प्रकरणात ४0७ लोकांना अटक करण्यात आली आहे. तर पेड न्यूजप्रकरणी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार रईस लष्करिया यांची १, कंबोज भाजपा दिंडोशी यांची ३, राजहंस सिंह काँग्रेस दिंडोशी यांची ३, डॉ. विनय जैन शिवसेना मालाड यांच्याविरोधात २, अणुशक्ती नगर या मतदारसंघाचे तुकाराम काते शिवसेना यांच्या विरोधात १ पेड न्यूजच्या प्रकरणाचा समावेश आहे.
|