मुंबई व परिसरात सध्या फैलावलेल्या डेंग्यूच्या साथीमुळे मुंबईकर बेजार झाले आहेत. पण, सध्या डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत डेंग्यूचा 'ताप' कायम राहाण्याची भीती असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत डेंग्यूच्या पेशंटची संख्या प्रचंड वाढली आहे. पालिकेकडील आकडेवारीनुसार आतापर्यंत डेंग्यूने सहा जणांचा बळी घेतला आहे. पण, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे १७४ पेशंट आढळून आले आहेत.
डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून पालिकेने सर्वप्रकारची काळजी घेतली आहे. पण, तरीही डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत आहे. पावसाळा संपल्यानंतरच्या काळापासून थंडीला सुरुवात होईपर्यंतचा काळ हा डेंग्यूच्या डासांच्या पैदाशीचा अत्यंत पोषक काळ असतो. सर्वसाधारणपणे या काळात डेंग्यूचा प्रकोप वाढतो. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत डेंग्यूचा ताप कायम राहील, असा अंदाज आरोग्य खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.