मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महानगर पालिकेत भाजपातर्फे तीन वेळा नगरसेवक पद, आरोग्य समिती अध्यक्षपदी व एकवेळ उप महापौर भुषविणाऱ्या आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचा पराभव करुन जायंट किलर ठरलेल्या विद्या ठाकूर यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शिवसेना- भाजपा युती तुटली आणि विद्या ठाकूर यांना उमेदवारीची लॉटरी लागली. नरेंद्र मोदींच्या हवेमुळे त्यांनी गोरेगाव मतदार संघातून विद्यमान शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा सहा हजार मतांनी पराभव केला. भाजपाचे वजनदार कार्यकर्ते जयप्रकाश ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. विद्या ठाकूर या त्यांच्या पत्नी आहेत. ठाकूर यांनी 2007 – 2008 साली मुंबई उप- महापौर म्हणून कार्यभार सांभाळला होता. परंतु, नगरसेवक म्हणूनच त्या परिचित होत्या.
ठाकूर यांना आगामी मुंबई महापालिका निवडणूकीवर डोळा ठेऊन उत्तर प्रदेशातील मतदारांची मते झोळीत पाडण्यासाठी राज्यमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे.