मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतून जवळपास ७३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून २६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर उपनगरातील २६ मतदारसंघांतून जवळपास ४७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुंबई शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत १३९ तर उपनगरातून ३८१ उमेदवार असे एकूण ५२० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने शहरातील सर्वच मतदारसंघांत पंचरंगी निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर मुंबईत ३६ जागांसाठी ५९३ उमेदवार रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यातील किती जण अर्ज मागे घेतात यावर लढती निश्चित होणार होत्या. त्यानुसार सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. ७३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. वांद्रे (पू.) येथून माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी अर्जाची पूर्तता न केल्याने फेटाळला.