म्हाडाच्या नावे बनावट वेबसाइट - सायबर पोलिसांकडे तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2014

म्हाडाच्या नावे बनावट वेबसाइट - सायबर पोलिसांकडे तक्रार


म्हाडाच्या घरांनाही आता जोरदार मागणी असल्याचे लक्षात घेऊन काही व्यक्तींनी चक्क म्हाडाच्या वेबसाइटप्रमाणे हुबेहूब बनावट वेबसाइट तयार करून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने तात्काळ ही वेबसाइट ब्लॉक केली असून याप्रकरणी सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 
www.mhada.net या बनावट नावाने ही वेबसाइट सुरू करण्यात आली होती. अशी कोणती बनावट वेबसाइट सुरू असल्याचे म्हाडा प्रशासनाच्या गावीच नव्हते. 'माझा नंबर सोडतीच्या प्रतीक्षा यादीत लागलेला आहे', असे सांगत एक व्यक्ती म्हाडाच्या 'मित्र' कार्यालयात चौकशीसाठी आली होती. त्याने संबंधित वेबसाइटचे नावही सांगितले. त्यावेळी म्हाडाच्या 'आयटी सेल'मधील कर्मचाऱ्यांनी खातरजमा केली असता, ही बनावट वेबसाइट असल्याचे उघड झाले.

विशेष म्हणजे त्याचे 'कव्हरपेज' हे www.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटप्रमाणेच होते. त्यावर म्हाडाच्या आयटी सेलला मिळालेला पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारतानाचा म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई व अन्य अधिकाऱ्यांचा फोटो, सोडतीतील प्रकल्पांची माहिती व इतर तपशील असे सर्व होते. त्यामुळे ही बनावट वेबसाइट असल्याचेही कोणाच्या चटकन लक्षात येण्यासारखे नव्हते.
या वेबसाइटच्या माध्यमातून नेमकी कोणाची आर्थिक फसवणूक झाली आहे हे लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, या प्रकाराने म्हाडाची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आयटी सेलचे प्रमुख अनिल अंकलगी यांनी दिली.

अधिकृत वेबसाइट सुरक्षितhttps://mhada.maharashtra.gov.in आणि https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट असून, या दोन्हींना 'https' हे सुरक्षिततेच्या प्रमाणकाची जोड देण्यात आलेली आहे. त्यामुळे म्हाडाची सोडत व अन्य योजनांविषयी माहिती घेताना याच वेबसाइटचा उपयोग करावा. नामसाधर्म्य असणाऱ्या अन्य वेबसाइटवरील कोणत्याही आवाहनाला किंवा जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

Post Bottom Ad