विटा - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊनही गुजरातमध्येच अडकलेत, गुजरातमधून ते बाहेर येतच नाहीत. देशाच्या प्रमुखाला सर्व राज्यांची काळजी असायला हवी, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली. विटा येथे आज (रविवार) सकाळी झालेल्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. नरेंद्र मोदी यांनी सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये सभा झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातच विटा येथे पवार यांची सभा झाली.
शरद पवार म्हणाले, ‘‘भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या जाहिरातीतून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राची बेदनामी करणाऱ्यांना बदनाम करा. मोदींच्या राज्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात. पण, त्याकडे लक्ष दिले जात नाही. केंद्रात पूर्ण बहुमत मिळूनही उत्तर प्रदेशात भाजपला तीन महिन्यातच मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. मोदी सरकारने कांद्याची निर्यात थांबवून शेतकऱ्यांचे संस्कार उद्ध्वस्त केले आहेत.‘‘