मुंबई – मुंबईत दरदिवशी चार मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती अॅड. आभा सिंह यांनी एका याचिकेमार्फत उच्च न्यायालयात सादर केली. या मुलींचा तपास करण्यात पोलिस दिरंगाई करत असून त्यांच्या जीवितास धोका असल्याने संबंधित पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी अॅड. सिंह यांनी न्यायालयात केली. मुंबईत महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आल्याने न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले.
मुंबईतील इस्थर अनुह्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांच्या पीठासमोर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान अॅड. आभा सिंह यांनी मुंबईत रोज बेपत्ता होणा-या मुलींचा तपशील सादर केला. २०१४ च्या जानेवारी ते जुलै दरम्यान ९२२ लहान मुली बेपत्ता आहेत. त्यापैकी अनेक जणींचा लागलेला नाही.
मुंबई पोलिसांच्या ‘मिसिंग पर्सन ब्युरो’च्या अहवालानुसार जानेवारी २००९ ते जुलै २०१४ दरम्यान १० हजार १४८ लहान मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार १८८ जणींचा शोध लागलेला नाही. याच काळात ८ हजार २८ मुलगे बेपत्ता झाल्याची नोंद असून ९१२ मुलांचा शोध लागलेला नाही. मुलांपेक्षा लहान मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होते.
बेपत्ता होणा-या मुलींच्या प्रकरणात इस्थर प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणात तक्रार न दाखल करण्यावरून कुर्ला रेल्वे पोलिसांचा बेजबाबदारपणा स्पष्ट होत असल्याचा आरोप अॅड. आभा सिंह यांनी केला. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत नसल्याने आरोपींचा शोध लावण्यात अडथळा येत असल्याचे अॅड. सिंह यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस, रेल्वे पोलिस व इतर प्राधिकरणांमध्ये योग्य समन्वय नसल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने सरकारला खडसावले.