जवखेडे खालसा येथे मागील आठवडय़ात झालेल्या दलित कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावे, या मागणीसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील मार्केटयार्ड चौक, नगर-पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले. तर सोमवारी तिसगांव तसेच पाथर्डी शहरही बंद ठेवण्यात आले होते.
जवखेडे खालसा येथे आठवडाभरापूर्वी जाधव कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. सात दिवस झाले तरी या प्रकरणाचे गूढ उकलण्यास यश न आल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली नगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मात्र, आठवले नगरमध्ये पोहचण्यापूर्वी विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची झाली. हे कार्यकर्ते रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यालाही पोलिसांनी आक्षेप घेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून आंदोलक व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पिडीत कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.