मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुंबई उपनगरातील मतदार यादीमध्ये २.२५ लाखापेक्षा जास्त नवमतदारांची नोंदणी झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम मतदार यादी तयार केली आहे. या यादीनुसार उपनगरात एकूण ७७.४१ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ७५.१६ लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २६ विधानसभा मतदारसंघ उपनगरात आहेत.
मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रम राबवले होते. मतदारांची वाढलेली संख्या हे त्याच उपक्रमांचे फलित आहे.
उपनगरामध्ये ४२.६४ लाख पुरुष, ३४.७७ लाख महिला आणि १३६ ट्रान्सजेंडर मतदार आहेत. चांदीवली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४.१८ लाख मतदार आहेत. घाटकोपर पूर्वमध्ये सर्वात कमी २.४८ लाख मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण ८.३३ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. मागच्या पाच महिन्यात राज्यात २८ लाख नवमतदारांची नोंदणी झाली आहे.