मुंबई शहरात औषधांचा तुटवडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

मुंबई शहरात औषधांचा तुटवडा

मुंबई - शहरात सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य तापाच्या साथींचे साम्राज्य पसरले असताना जीवरक्षक औषधांसह प्रतिजैविके, डायबेटिस, ब्लडप्रेशरवरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वी मिळणाऱ्या उपलब्धतेमध्ये या औषधांचा पुरवठा १५ टक्क्यांनी घटल्याचे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कंपन्यांमधील अंतर्गत वाद, मुंबईबाहेर स्थलांतरित झालेल्या कंपन्यांसह जीवरक्षक औषधांबद्दल नव्याने आलेल्या औषधदरनियंत्रण कायद्यामुळे औषधांचा हा तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता औषधविक्रेते व संघटना व्यक्त करत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून प्रतिजैविकांसह लहान मुलांची काही औषधे, अॅण्टीरेबिजची इंजेक्शन्स, रक्त पातळ होण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांची तूट निर्माण झाली आहे. यापूर्वी औषध कंपन्यांकडून मिळणारा मागणीचा मासिक कोटाही पूर्ण केला जात नाही. जितकी मागणी असते, त्याहून अधिक औषधे कंपन्या पूर्वी देत असत, मात्र आता साथींच्या रोगांमुळे मागणी वाढली तरीही औषधे वेळेवर मिळत नसल्याचे केईएम हॉस्पिटलच्या परिसरातील औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हा तुटवडा केवळ शहरात नसून संपूर्ण राज्यात निर्माण झाल्याचे महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन्सचे अध्यक्ष दिलीप मेहता स्पष्ट करतात. १०८ जीवरक्षक औषधांच्या किंमतीवरील नियंत्रण उठवण्यासंदर्भातील केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशामुळे हा तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता ते व्यक्त करतात. औषधांच्या या किंमतींमधील बदलांमुळे उप्तादन व पुरवठ्याचे गणित बदलले आहे. दोन ते तीन महिन्यानंतर औषधांचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad