तासगाव - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रातील प्रथमच निवडणुका होत आहेत. बाळासाहेबांबद्दल असलेली श्रद्धा आणि आदरामुळे मी ठरविले आहे, की शिवसेनाविरोधात एक शब्दही बोलणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तासगाव येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी युती तुटल्यानंतर शिवसेनाबाबत असलेली आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मोदींनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले, ‘‘बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेवर टीका करणार नाही, हीच त्यांना माझी श्रद्धांजली असेल. प्रत्येक गोष्टीला राजकारणशी जोडू नये. त्यांच्या आदरासाठी मी शिवसेनेविरोधात एक शब्दही बोलणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पूर्ण बहुमत असणारे सरकार बनवा, मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार कधीच बनवू नका. पूर्ण बहुमत असणारे सरकार बनवा, त्यानंतर आम्हाला जाब विचारा. मी एक कामदार बनून देशाची सेवा करत आहे. सांगलीतील जनतेने लोकसभा निवडणुकीत मी मागितले त्यापेक्षा जास्त दिले आहे. संजयकाका पाटील यांना निवडून दिल्याने मी मतदारांचे आभार मानतो. गुजरात आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वच जण वापर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मुंबई विमानतळ, व्हिक्टोरिया टर्मिनसला शिवाजी महाराजांचे नाव भाजप सरकारच्या काळात देण्यात आले आहे. साठ वर्षांत तुम्ही काही केले नाही आणि मला साठ दिवसांचा हिशोब मागत आहात. सत्तेत आल्यावर नर्मदा प्रकल्पाला मंजूरी दिली, नर्मदा प्रकल्पाला मंजूरी दिल्याने महाराष्ट्राला वीज मिळेल. आमच्या शिवभक्तीवर प्रश्नचिन्ह नको.‘‘